गुहा कशा तयार होतात?
खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देता येईल. पाण्यामुळं. पण त्यानं फारसा बोध होणार नाही. कारण पाणी जरी गुहा तयार करायला कारणीभूत असलं तरी पाणी असणं ही त्या प्रक्रियेची सुरुवात आहे. त्या प्रक्रियेत पाण्याव्यतिरिक्त इतरही घटक सहभागी आहेत. तेव्हा त्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय गुहा कशा तयार होतात हे ध्यानात येणार नाही.
पर्वतमाथ्यावर पावसाचं पाणी पडतं. त्या ठिकाणीच काही वनस्पती वाढत असतात. काही प्राणीही असतात. हे मृत झाले की त्यांची कलेवरंही तिथंच पडतात. ती कुजली की त्यांच्यामधून कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडतो. तो पाण्यात विरघळतो आणि त्यातून कार्बोनिक आम्ल तयार होतं. त्या आम्लाचा काही प्रकारच्या खडकांवर परिणाम होतो.
खास करून चुनखडीच्या खडकांवर त्यांचा जास्त परिणाम होतो. कारण चुनखडी पाण्यात विरघळते; आणि त्या पाण्यात जर कार्बोनिक आम्ल असेल तर मग विरघळण्याचा वेग आणि त्याची मात्रा या दोन्हीत वाढ होते. प्रथम त्या खडकामध्ये असलेल्या छिद्रांमध्ये आणि भेगांमध्ये हे कार्बोनिक आम्लयुक्त पाणी झिरपतं आणि ती रुंदावतात.
हे रुंदावणं वाढत जाऊन तिथं पोकळ्या निर्माण होतात; पण पाणी झिरपतच असतं. त्यामुळे हळूहळू खडकांचे खालचे स्तरही विरघळू लागतात. पाणी नेहमी आपली पातळी गाठण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळेच ते झिरपणारं पाणी भूमिगत जलसाठ्याची पातळी गाठण्याच्या प्रयत्नात खाली खाली झिरपत जातं. खडकांचे खालचे, त्याही खालचे स्तर विरघळत त्या पोकळ्या वाढत जातात. त्यांची रुंदी, उंची आणि खोली तिन्हीतही वाढ होते. गुहा जन्माला येते.
तिथलं पाणी आपली वाट शोधत त्या गुहेतून बाहेर पडतं. त्याचा प्रवाह, ओहोळ होतो. चुनखडीमधून पाणी झिरपत असताना त्या पाण्याच्या थेंबापाठोपाठ त्या चुनखडीच्याही लोंबकळणाऱ्या साखळ्या तयार होतात. काही वेळा त्या गुहांच्या जमिनीवरच्या चुनखडीचे सुळके तयार होतात. त्यांनाच स्टॅलॅक्टाईट आणि स्टॅलॅग्माईट म्हणतात. हे त-हेत-हेचे चित्रविचित्र आकार धारण करतात, त्या गुहांना एक आगळंच सौंदर्य प्राप्त करून देतात.