मांजर आपल्या पायांवरच कसं पडतं?

कितीही उंचीवरून पडो, मांजर नेहमी आपल्या पायांवरच पडतं.; खरं तर ते अलगद उतरतं असंच म्हणायला हवं; कारण पायावर का असेना, पण पडलं तर त्याला इजा होण्याचा संभव असतोच; आपण काही उंचीवरून पायांवर जरी पडलो तरी पायाचं हाड मोडू शकतं; पण मांजराच्या बाबतीत तसं होत नाही. कारण ते जमिनीवर येतं तेव्हा त्याचा वेग अतिशय कमी असतो.

         परॅशूट घेऊन उतरणारा छत्रीधारी कसा कोणतीही इजा न होता उतरू शकतो; तसंच मांजर उंचीवरून अलगद आपल्या पायांवरच उतरतं.हे त्याला साध्य होतं याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे; मांजराला हवेत असतानाही वर आणि खाली यांचं बरोबर भान असतं; त्यामुळे ते पाठीवर असलं तरी हवेतल्या हवेतच गिरकी घेत आपलं डोकं वर आणि पाय खाली करू शकतं.; आणि हे ते साध्य करतो कारण त्याचा हाडांचा सांगाडा खास प्रकारे बनलेला असतो; हे दुसरं कारण.

मांजराचा कणा अतिशय लवचीक असतो; आणि आपल्याला कण्याच्या दोन्ही बाजूंना जाणारं जे कॉलरबोन असतं ते मांजरांना नसतं. त्यामुळे त्यांची शरीरं अतिशय लवचीक बनून त्यांचा घाट ते हवं तसं बदलू शकतं. त्याचमुळं फारशी तडफड करावी न लागता ते झटक्यात आपला मोहरा फिरवू शकतं.

मांजरांचा खास अभ्यास केलेल्या वैज्ञानिकांना केवळ दोन आठवड्याच्या मांजरांच्या पिल्लांमध्येही ही खासियत असल्याचं दिसून आलं आहे. ती हवेतच झटकन आपला मोहरा बदलू शकतात; आणि त्यांचं वय सहा-सात आठवड्यांचं होईपर्यंत तर ही कला त्यांना चांगलीच आत्मसात झालेली असते. एकदा का असा मोहरा वळवून ते जमिनीकडे येऊ लागलं, की आपले चारही पाय पसरून आणि शेपटी फेंदारून ते आपला मोमेन्ट ऑफ इनर्शिया बदलू शकतं.

स्वतःभोवती गिरक्या घेणारी नर्तिका आपले हात आवळून घेत आपल्या गिरक्यांचा वेग वाढवते आणि तेच हात पसरून गिरक्यांचा वेग कमी करते, तेव्हा तीही आपल्या मोमेन्ट ऑफ इनर्शिया मध्ये बदल करत असते.

हात पसरून तो वाढवला की वेग कमी होतो आणि हात आवळून घेत तो कमी केला की वेग वाढतो. हे मांजराला सहजसाध्य होतं. त्यामुळे जमिनीजवळ येताना त्याचा खाली येण्याचा वेग कमी झालेला असतो. त्याचमुळे त्याला अलगद उतरता येतं.

– डाॅ. बाळ फोंडके

संकलन – सतीश चिंधालोरे

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.