बिनबियांच्या फळाचं उत्पादन कसं होतं?

 फळ खाता-खाता एके दिवशी एका मुलाच्या पोटात त्याचं बी गेलं आणि पोटामधून मग झाड उगवलं, अशा अर्थाचं एक बडबडगीत आहे. फळ खाताना बी थुंकून टाकून दिली पाहिजे, हा धडा शिकविण्यासाठी कदाचित त्या गीताचा उपयोग होत असेलही; पण अडचणीची वाटली तरी फळामधल्या बीलाही काही महत्त्व आहे हे विसरता येत नाही.

बीच नसेल तर मग त्या झाडाची लागवड कशी करता येईल? आणि तीच करता आली नाही तर मग ती फळे तरी कशी मिळतील? असे सवाल मनात उठत असतानाच आठवतं, की केळं या आपल्या सर्वांनाच परवडणाऱ्या फळात कुठं बी असते ? आणि आजकाल मिळणारी बहुतेक द्राक्षं तर सीडलेस जातीचीच असतात; इतरही काही अशी बिनबियांची फळे आता मिळायला लागली आहेत. साहजिकच अशा फळांचं उत्पादन कसं होतं हा सवाल उभा राहतोच.

सामान्यपणे फुलांमधल्या स्त्रीकेसरांचं आणि पुंकेसरांचं मीलन झालं की त्यातलं बीज फलित होतं आणि त्यातून मग फळधारणा होत असते. अशा फलित बीजापासून झालेल्या फळांमध्ये बीही तयार होतं; पण काही झाडांमध्ये अशा प्रकारे बीज फलित झाल्याशिवायच फळधारणा होऊ शकते. या प्रक्रियेला पार्थिनोकापी असं म्हणतात. या प्रक्रियेनं तयार झालेल्या फळांमध्ये बी तयार होत नाही.

काही वेळा एकाच झाडावरची काही फळ नेहमीच्या बीजफलनाच्या प्रक्रियेतून तयार होतात, तर काही पार्थिनोकार्पींच्या प्रणालीतून तयार होतात. अशा फळांचा झाडाला उपयोगही होतो. कारण मग फलनासाठी मदत करणाऱ्या पक्ष्यांना काही खाद्य पुरवता येतं; आणि त्याच्या आशेनं तिथं जमा झालेले पक्षी बीजफलनालाही हातभार लावतात. काही झाडं नैसर्गिकरित्याच पार्थिनोकापी प्रणालीचा वापर करतात. अशा झाडांवरची फळं नेहमीच बिनबियांची असतात. 

आता वैज्ञानिकांनीही कृत्रिमरित्या पार्थिनोकापी उद्युक्त करण्याची किमया साध्य केली आहे. त्यातूनच मग सीडलेस द्राक्ष, पपया, नेव्हल जातीची संत्री किंवा कलिंगड यांचं उत्पादन होत असतं. अशा झाडांची लागवड बियांद्वारे न करता त्यांची कलमं करून किंवा रोपटी लावून केली जाते.

चुकूनमाकून अशा फळांमध्ये काही बी आढळलंच तर एक तर ते रुजतच नाही किंवा रुजलं तर त्यापासून तयार होणारी फळे वेगळ्याच गुणधर्मांची आणि जातकुळीची निघतात. पार्थिनोकापींच्या प्रणालीचा अवलंब केल्यामुळे एकंदरीत उत्पादनातही भरघोस वाढ होते आणि अशी फळे ग्राहकांच्या पसंतीलाही उतरतात.

– डाॅ. बाळ फोंडके

संकलन – सतीश चिंधालोरे

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.