औषधांनी स्मरणशक्ती वाढते का?
आजकाल अनेक वृत्तपत्रांमध्ये व केबल चॅनेल्सवर स्मरणशक्ती/ बुद्धी वाढवणाऱ्या औषधांचे पेव फुटले आहे. आमचे औषध घेतल्याने नापास होणारा मुलगा मेरीटमध्ये आला असे दाखलेही दिलेले असतात. साहजिकच मुले व त्यांचे पालक या दोहोंनाही अशा औषधांचे आकर्षण वाटू लागते. स्मरणशक्ती तसेच बुद्धिमत्ता हे मोठ्या मेंदूचे कार्य आहे. सर्व व्यक्तींच्या मेंदूचा आकार व वजन जवळपास सारखेच असतात. तरीही काही व्यक्ती हुशार तर काही मठ्ठ का बरे असाव्यात?
बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे यथायोग्य आकलन करून, प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त प्रभावी, उपयुक्त असा निर्णय घेण्याची क्षमता. म्हणूनच औपचारिक शिक्षण न घेतलेला निरक्षर शेतकरीही पढीक पंडितापेक्षा बुद्धिवान असू शकतो.
माहिती वा ज्ञान मिळवणे, जीवनात विविध अनुभव घेता येणे, मार्गदर्शन मिळणे या सर्वांवर बुद्धिमत्ता अवलंबून असते. मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे काम करतो. खरे तर संगणक मेंदूप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो असे म्हणायला हवे! दोन वस्तूंचा परस्पर संबंध जोडून तर्काद्वारे मेंदू त्या लक्षात ठेवतो. दोन असंबद्ध गोष्टी लक्षात राहत नाहीत ते याचमुळे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर दोन गोष्टीत संबंध तर्क लढवून निर्माण करावा लागेल व एकात एक अशी त्यांची साखळी तयार करून कोणतीही क्लिष्ट गोष्ट लक्षात ठेवता येईल.
म्हणजे स्मरणशक्ती वाढवणे आपल्या हातात आहे. वाचन वाढवणेही आपल्या हातात आहे. मग दररोज २५० मि.ग्रॅ. गोळी वा औषधे खाऊन एखाद्या शॉर्टकटने बुद्धी वा स्मरणशक्ती वाढणे शक्य आहे का याचा विचार तुम्हीच करायचा आहे!