आपल्याला वास कसा येतो?

👃 आपल्याला वास कसा येतो? 👃

        नको तिथं जे आपण खुपसतो त्या नाकामुळ आपल्याला वास येतो. गंधज्ञान होतं. नाक हा अर्थात सहज दिसणारा आणि चेहऱ्यावर तसा ठसठशीत असलेला अवयव आहे. गंधज्ञान होतं ते आतल्या भागात. आपण नाकावाटे, म्हणजेच दोन्ही नाकपुड्यांमधून बाहेरची हवा ओढून आत घेत असतो. त्या हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डाय ऑक्साईड यासारखे वायू असतात, पाण्याची वाफ असते.

काही धुळीचे कण असतात. फुल, फळ, एवढंच कशाला, तर इतर अनेक पदार्थानाही त्यांचा त्यांचा विशिष्ट गंध असतो. गंधयुक्त रसायनं बाष्पनशील म्हणजे त्यांचे रेणू सहजगत्या हवेत उडून जाऊ शकतात. साहजिकच नाकावाटे आत घेतलेल्या हे गंधाचे रेणूही आपल्या नाकपुड्यांमध्ये शिरतात. नाकपुड्यांमध्ये बारीक बारीक केस असतात.

ते एखाद्या चाळणीसारखं काम करतात. हवेतील धूलिकण त्यांच्यात अडकून तिथेच राहतात. नाकातून वाहणार्‍या स्रावांमधुन ते बाहेर टाकले जातात; पण वायू, त्यातच गंधयुक्त रसायनाचे रेणूही आले; पुढे जाऊन नाकापाठच्या पोकळीत शिरतात. ही पोकळी मोठी असते; ती तशी असल्यामुळेच आपलं गंधज्ञान अधिक प्रखर होतं. या पोकळीच्या शेवटी ‘ओलफॅक्टरी बल्ब’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या गंधग्रंथी असतात. त्या ग्रंथींच्या पेशीच्या बाहेरच्या आवरणावर गंधयुक्त रसायनांना दाद देणारे ग्राहक रेणू असतात.

आपल्या नेहमीच्या भाषेत सांगायचं तर, गंधाचे रेणू आणि त्यांना दाद देणारे ग्राहक रेणू यांचं एकमेकांशी कुलूप आणि ते उघडू शकणाऱ्या एकमेव किल्लीसारखं असतं. ग्राहक रेणूंची रचनाच अशी असते, की त्याच्या खोबणीत गंघरसायनाचा रेणू चपखल बसतो. प्रत्येक गंधरेणू साठी वेगवेगळी खोबण असते. त्यामुळे गंधांची गल्लत होत नाही. एकदा का हा रेणू त्या खोबणीत जाऊन बसला, की त्या ग्राहक रेणूला जोडलेला मज्जातंतू तो संदेश घेऊन मेंदूकडे पोहोचतो.

हा संदेश विद्युतरासायनिक लहरीच्या रूपातला असतो. मेंदूच्या गंधज्ञान केंद्राकडे तो संदेश पोहोचला की, तिथं त्याचं वाचन होतं. त्या संदेशातली माहिती मेंदूमध्ये साठवलेल्या ज्ञान संग्रहातील माहिती ताडून पाहिली जाते. मग आपल्याला तो गंध चंदनाचा आहे की शेणाचा आहे याचं आकलन होतं. चंदनाचा असला तर खोलवर श्वास ओढून घेण्याची प्रेरणा दिली जाते. तोच शेणाचा असला तर नाकाच्या स्नायूंना मुरडून नाकाची कोंडी करण्याचा आदेश दिला जातो.

– डाॅ. बाळ फोंडके

संकलन – सतीश चिंधालोरे

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.