आपली नखं कशी वाढतात?
आपली नखं म्हणजे शरीराच्या इतर कोणत्याही अवयवासारखीच, पेशींचीच बनलेली असतात. फरक एवढाच, की या पेशी मृत असतात आणि त्यात केरॅटिन या प्रथिनाचे रेणू गुंतलेले असल्यामुळे ती इतर पेशींसारखी मऊ न राहता कठीण बनतात. हाताच्या किंवा पायाच्याही बोटांच्या टोकाला असलेल्या मऊ आणि नाजूक भागाचं रक्षण करण्याचं काम ही कठीण नखं करतात. तरीही ती पेशींचीच बनलेली असल्यामुळे त्यांची वाढही पेशींच्या वाढीनेच होते.
नखांच्या मुळाशी असलेल्या कातडी च्या आतल्या बाजूला एक अतिशय मुलायम उती असते. तिचा रंग पांढरा असतो व आकार अर्धचंद्रासारखा असतो. या आकारावरूनच त्याचं ल्युन्युला असं नाव ठेवलं गेलं आहे. या ल्युन्युलामध्येच केरॅटिनचं उत्पादन होत असतं. ते त्या पेशीशी एकजीव होऊन त्याचं कठीण कवच त्या नखांच्या मुळांवर चढतं. तिथल्या त्या नखाच्या मुळाची लांबी अशी वाढल्यामुळे सगळ नखच वरच्या दिशेनं ढकललं जातं. हेच आपल्याला नखाच्या वाढीच्या रूपात दिसतं, आपण नखं कापत राहतो आणि त्याच्या मुळाशी त्याची अशी वाढ होत राहते. हाताच्या बोटांची नखं आणि पायाच्या नखं एकसारखी असतात व त्यांची वाढ होण्याची प्रक्रियाही सारखीच असते. तरीही हाताच्या बोटांची नखं पायाच्या बोटांच्या नखांपेक्षा अधिक वेगानं वाढतात.
हा वेग साधारणपणे वर्षाकाठी तीन सेंटीमीटर एवढा असतो. नखांच्या दोन्ही बाजूला आणि मुळाशी ती तिथल्या कातडीच्या पेशींशी धाग्यासारख्या उतींनी बांधलेली असतात. हे घागे लवचीक व चिवट असतात. त्यामुळे नखं जागच्या जागी व्यवस्थित बांधली जातात. ज्याच्यामुळे नखांची वाढ होते त्या ल्युन्युलाचा आकार अर्धचंद्रासारखा असल्यामुळे वाढणाऱ्या नखांचाही आकार साधारणपणे तसाच राहतो.
ल्युन्युलाचा पांढरा रंग निरोगीपणाचं लक्षण आहे; पण तोच रंग निळसर झाला तर रक्ताभिसरणात काहीतरी बिघाड झाल्याचं ते लक्षण मानलं जातं. म्हणूनच नखांची परीक्षा करून काही व्याधींचं निदान करण्याची पद्धतही विकसित केली गेली आहे.
– डाॅ. बाळ फोंडके (कसे?)